विटा : विटा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ६ मध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे ही प्रक्रिया आज, मंगळवारपासून थांबविण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पालिकेतील विरोधी गटाने स्वागत केले असून, फटाक्यांची आतषबाजी केली. पालिकेच्या २०११ च्या निवडणुकीत प्रभाग क्र. ६ मधून विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीतून रूपाली मेटकरी विजयी झाल्या होत्या. मात्र, पालिका कौन्सिल सभांना सहा महिने गैरहजर राहिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सत्ताधारी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सौ. मेटकरी यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर प्रभाग क्र. ६ ची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी सौ. मेटकरी यांनी उच्च न्यायालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत पोटनिवडणूक प्रक्रिया थांबवून सदस्यत्व कायम ठेवावे, अशी मागणी केली होती. या याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता. आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया स्थगित करण्याबाबत आदेश दिले. सायंकाळी ५ वा. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांना लेखी पत्र देऊन आदेश दिल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली. शिवाजी चौक, बसस्थानक परिसरात विरोधकांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. (वार्ताहर)उमेदवारी अर्ज ठरले निरुपयोगीआज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. दुपारी तीनपर्यंत स्थगितीबाबत आदेश नसल्याने ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याने सत्ताधारी गटातून सौ. वैशाली प्रताप सुतार, तर विरोधी गटातून सौ. जयश्री सुनील मेटकरी यांचे अर्ज दाखल झाले होते. परंतु, हे अर्ज स्थगिती प्रक्रियेमुळे निरोपयोगी ठरले आहेत.पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती मिळणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आज प्रसिध्द केले होते. या वृत्ताची तालुक्यात मोठी चर्चा होती. सायंकाळी पाच वाजता निवडणूक अधिकारी इथापे यांनी स्थगिती दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकमतचा अंदाज अचूक ठरला.
विट्यात पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती
By admin | Updated: December 24, 2014 00:24 IST