जत : तालुक्यातील खोजानवाडी येथे भावकीच्या वादातून व मामाची जमीन खरेदी केल्याच्या रागातून दोन एकर तुरीच्या पिकावर तृणनाशक फवारले. त्यामुळे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले.
याबाबत खोजानवाडी येथील शेतकरी व माजी सैनिक संगाप्पा कनमडी यांनी जत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार बसवराज मल्लाप्पा कनमडी, महादेवी मल्लाप्पा कनमडी, भीमराया मल्लाप्पा कनमडी, महादेव अण्णाप्पा कनमडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगाप्पा कनमडी माजी सैनिक असून खोजानवाडी ते मेंढेगिरीदरम्यान त्यांची दोन एकर शेतजमीन आहे. त्यात त्यांनी तूर लावली आहे. यातील संशयितांनी भावकीचा वाद व मामाची जमीन खरेदी केल्याचा राग मनात धरून तृणनाशक पंपाच्या साहाय्याने संपूर्ण पिकावर फवारले. यावेळी संगाप्पा कनमडी यांनी पिकांचे नुकसान करू नका म्हणून अटकाव केला असता त्यांनाही मारहाण केली. तृणनाशकामुळे सध्या तुरीचे करपू लागले असून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.