मिरज : मिरज परिसरात गुजराण करण्यासाठी वास्तव्य करणाऱ्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील भटक्या विमुक्तांना रुग्ण सेवा प्रकल्पातर्फे अन्नदा आहार कीटचे वाटप करण्यात आले. उंट फिरवून मुलांची करमणूक करणारे मराठवाड्यातून आलेले कष्टकरी मिरजेत कोल्हापूर रस्ता येथे वास्तव्यास आहेत. जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिसांच्या वेशात शहरांत फिरून मदत मागणारे बहुरूपी पंढरपूर रस्त्यावर हॉटेल नशेमनसमोर वास्तव्यास आहेत. कसरतीचे खेळ करणारी डोंबारी कुटुंबे तेथे झोपड्यात राहत आहेत. कोरोना लाॅकडाऊन काळात निर्बंधामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रेयस गाडगीळ व मिलिंद भिडे यांनी या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करून अन्नदा संस्थेच्या सहकार्याने आहार कीटचे वाटप केले. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. भालचंद्र साठ्ये, मिलिंद भिडे, नितीन मोरे उपस्थित होते.
भटक्या-विमुक्तांना अन्नदाचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:19 IST