ओळ : सावर्डे (ता. तासगाव) येथे जगनू पवार व कुटुंबीयांना ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक साहित्याची मदत केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : अन्यायग्रस्त जगनूला मदतीचा हात देण्यासाठी अनेक हात स्वयंस्फूर्तपणे सरसावले आहेत. माणुसकी हरवत चाललेल्या समाजात माणुसकीला साथ देणाऱ्या अनेकांनी जगनू पवारला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जगनूवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावर्डे (ता. तासगाव) येथे जगनू पवार याची झोपडी जाळून त्याचे आयुष्य रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. या घटनेला ‘लोकमत’मधून वाचा फोडण्यात आली. त्यानंतर अनेक स्तरांतून या घटनेचा निषेध करण्यात आला. अनेक संस्था, संघटना, व्यक्तींनी ‘लोकमत’च्या माध्यमातून जगनूचा संसार सावरण्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे माणुसकी हरवत चाललेल्या दुनियेत अजूनही माणुसकीचा झरा कायम असल्याचे दिसून आले.
आरपीआयच्यावतीने जगनू पवारच्या कुटुंबाला जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, दिनेश डावरे, मनोज धेंडे, धीरज कांबळे, कैलास चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट :
सावर्डेत झालेली घटना संतापजनक आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेच्या मुळाशी जाऊन दोषींना कठोर शिक्षा करायला हवी. प्रशासनाने दोषींना पाठीशी न घालता कारवाई करायला हवी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. पुरोगामीत्वाचा ढोल पिटणारे लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबाची भेट घेण्याची तसदीदेखील घेतली नाही. आरपीआयच्यावतीने पिढीत कुटूंंबाला घर बांधून देणार आहे. त्यांना शासनाकडून हक्काची जागा मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- संदेश भंडारे, सदस्य, जिल्हा दक्षता नियंत्रण समिती.
------
ग्रामपंचायतींकडून निषेध
सावर्डे ग्रामपंचायतींच्यावतीने जगनू पवारचे घर जाळणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.