लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी गणेशनगर येथे रोटरी हॉलमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरला अमेरिकेतून ७५ हजार रुपयांची देणगी मिळाली. मूळ सांगलीचे व सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले ब्लेसन बाबू जॉर्ज यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत पाठविली.
चव्हाण यांनी रोटरी हॉलमध्ये ५० बेडचे कोविड सेंटर सुरू केले असून, त्यामध्ये १० ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णांना चहा-नाश्ता व जेवणही दिले जाते. आजवर अनेक तातडीच्या रुग्णांना याचा लाभ झाला आहे. या उपक्रमाची माहिती अमेरिकेतील जॉर्ज यांना मिळाली. आपल्या शहराशी नाळ कायम ठेवण्याच्या जाणिवेने त्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. कोविड सेंटरला मदत म्हणून ७५ हजार रुपये पाठविले. चव्हाण म्हणाले की, सामाजिक दातृत्वामुळे अनेक रुग्णांना कोरोनातून दिलासा देण्याचे काम सुरू आहे. रोख रकमेसह धान्य व वस्तूंच्या स्वरूपात मदतीसाठी हात पुढे येत आहेत. जिल्ह्यातून कोरोना नाहीसा होईपर्यंत कोविड सेेंटर सुरू ठेवले जाईल. यासाठी चव्हाण यांच्यासह किशोर लाटणे, विजय आवळे, अथर्व कराडकर, विनायक लाटणे, ओंकार शिंदे, अभिषेक शिंदे, कुणाल शंभवाणी, संतोष कुकरेजा, सुमीत छाबडा आदी परिश्रम घेत आहेत.