लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आरोग्यासाठी सामाजिक कृती या अभियानांतर्गत संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या वतीने मदत कक्ष स्थापन करण्यात आला. या संस्थेचे कवठेमहांकाळ व शिराळा तालुक्यामध्ये काम सुरू आहे.
या आरोग्यासाठी सामाजिक कृती या मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णालयात येणाऱ्या लोकांना आरोग्याच्या विविध योजनांची माहिती देणे, योजना मिळण्यासाठीची प्रक्रिया सांगणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे तसेच कोविड १९ विषयी जनजागृती इत्यादी मदत करण्यात येणार आहे.
या आरोग्याच्या योजनांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना इत्यादी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच कोरोना लसीकरण जनजागृतीही करण्यात येणार आहे.
या मदत कक्षाच्या उद्घाटनासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. जुबेर मोमीन उपस्थित होते. ते म्हणाले की, या मदत कक्षासाठी रुग्णालयाकडून सर्व प्रकारची मदत करू. याप्रसंगी डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मयुरी राजमाने, सुनीता फाळके, दीपाली कांबळे, राणी देशमुख, संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या जिल्हा समन्वयक अनुप्रिया कदम, सुलभा होवाळे, संगीता भिंगारदिवे आदी उपस्थित होते.