येळापूर : मदतीला धावला आणि जिवाला मुकला, असाच प्रकार गवळेवाडी (ता. शिराळा) येथील संतोष शिंदे या युवकाच्याबाबतीत घडला आणि त्याचे अख्खे कुटुंब उघड्यावर पडले.संतोष महादेव शिंदे (वय ३२) याचे गवळेवाडी (येळापूर) हे गाव. नोकरीनिमित्त तो मुंबई येथील विक्रोळी भागात राहत होता. तिथेच त्याने नोकरी करीत स्वत: रंगकामाचा व्यवसाय सुरू केला. त्यातून मिळालेल्या पैशातून खोली घेतली होती. त्याचे हे काम नित्य सुरू होते. मात्र दुसऱ्याच्या मदतीला कायम धावण्याचा त्याचा स्वभाव होता. शनिवार, दि. १७ आॅक्टोबर रोजी तो खोलीत असताना जवळच्याच चौहान कुटुंबियांच्या घरात गॅस गळती सुरू असल्याचे समजले. त्याने कोणताही विचार न करता तात्काळ त्या कुटुंबियांच्या मदतीसाठी धाव घेतली. चौहान कुटुंबातील पाच सदस्य आणि वरच्या मजल्यावर राहणारे भाडोत्रीही घाबरले. चाळीत राहणारे लोक सैरावैरा पळू लागले. घरात सपना नावाची मुलगी अडकून पडल्याचे समजताच त्याने पुन्हा चौहान यांच्या घरी धाव घेतली. तो सपनाला उचलून बाहेर पडणार, तोच गॅसचा भीषण स्फोट झाला. त्यात सपनाचा भाजून जागीच मृत्यू झाला, तर संतोष शिंदे याच्यासह दहाजण गंभीर जखमी झाले. संतोष यामध्ये ८५ टक्के भाजला होता. त्याला व इतर नऊजणांना आ. राम कदम यांनी स्वत: राजावाडी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. संतोष याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. संतोषवर रविवारी, २५ रोजी गवळेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)सर्वत्र हळहळ...धाडसी असलेल्या संतोषला शनिवार, दि. २४ रोजी मृत्यूला सामोरे जावे लागले. याच्या निधनामुळे गवळेवाडीसह विक्रोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मदतीला धावला आणि जिवास मुकला!
By admin | Updated: October 27, 2015 00:04 IST