सांगली : कोरोनाच्या महामारीत मृत झालेल्या परवानाधारक रिक्षाचालकाच्या पत्नीला ऑफलाइन स्वरूपात सानुग्रह मदतीची मागणी रिक्षा व्यवसाय बचाव कृती समितीने केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदन दिले.
लॉकडाऊनमुळे राज्य शासनाकडून परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत दिली जात आहे; पण अनेक परवानाधारक तांत्रिक त्रुटींमुळे मदतीपासून वंचित राहत आहेत. त्यांचाही विचार करण्याची मागणी कृती समितीने निवेदनाद्वारे केली.
निवेदनातील मागण्या अशा : मृत रिक्षाचालकाचे वाहन व परवाना हस्तांतरण झालेल्या चालकाला मदत मिळावी. मृत झालेल्या अनेक परवानाधारकांच्या पत्नींकडे स्वतंत्र परवाने नाहीत, त्यामुळे त्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. बदली परवाना घेतलेल्या चालकालाही ऑफलाइन सानुग्रह मदत मिळावी.
निवेदन देण्यासाठी कृती समितीचे महेश चौगुले, राजू रसाळ, तुषार मोहिते, अजमुद्दिन खतीब, बंडू तोडकर, फारुख मकानदार, बाळू खतीब, अरिफ शेख, महेश सातवेकर, विशाल निकम, रशीद शेख, शिवाजी जाधव, मारुती सलगर, सुहास कांबळे, वसीम सय्यद, मोहसीन पठाण आदी उपस्थित होते.