सांगली : सांगली, मिरज परिसरात शनिवारी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार आहे.
सांगली शहरात सकाळपासूनच ढगांची दाटी होती. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. दुपारी २ वाजता पावसास सुरुवात झाली. दीड तास पावसाने हजेरी लावली. सायंकाळीही ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस होता. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, आगामी तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. रविवारी जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
दीड तास पडलेल्या पावसाने शहराच्या सखल भागात पाणी साचले. ढगाळ वातावरण व पावसामुळे जिल्ह्याच्या कमाल तापमानात काही अंशी घट झाली. शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३० तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.