सांगली : सांगली, मिरज शहर व परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी सकाळपासूनच ढगांची दाटी होती. साडेनऊ वाजता पावसास सुरुवात झाली. सुमारे दोन तास पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही अधूनमधून विश्रांती घेत दिवसभर सरी कोसळत राहिल्या. शनिवारी कमाल तापमान २८ तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ऑगस्टच्या सरासरीइतकेच सध्या तापमान आहे. आठवडाभर ते स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या १७ व १८ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर १९ ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर ओसरणार आहे.