सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील १७0 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी सोमवारी, ३0 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मदन पाटील यांच्या वारस नोंदीच्या प्रक्रियेबरोबरच सहकारमंत्र्यांसमोर यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाची प्रत चौकशी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असल्यास, त्यानुसार प्रक्रिया पार पाडली जाण्याची चिन्हे आहेत. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोन तत्कालीन अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्या निर्णयांविरोधात सहकार विभागाकडे अपील केले होते. कागदपत्रांच्या प्रती विकत देण्याच्या मुद्द्यावर हे अपील होते. त्यामुळे सहकार विभागाने याप्रकरणी दोघा अधिकाऱ्यांपुरती चौकशीला स्थगिती दिली होती. उर्वरित प्रकरणात चौकशी सुरूच ठेवण्याचा निर्णय चौकशी अधिकाऱ्यांनी घेतला होता. सहकारमंत्र्यांसमोरील सुनावणीही १८ नोव्हेंबर रोजी झाली. घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांपैकी काही संचालकांनी, अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले आहे. आणखी काहींचे म्हणणे अद्याप सादर होणार आहे. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी होऊन डिसेंबरपासून युक्तिवादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वसंतदादा बँक घोटाळाप्रकरणी आज सुनावणी
By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST