शिरटे : वाळवा पंचायत समितीच्या सभेत पं. स. सदस्यांनी वादग्रस्त कारभाराने नेहमीच चर्चेत राहिलेल्या आरोग्य विभागास टीकेचे लक्ष्य केले. तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांकडून सलाईन लावण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा गंभीर आरोप पं. स. सदस्य सुभाष पाटील यांनी केला. यावर सभापती रवींद्र बर्डे यांनी या घटनेची चौकशी करुन कारवाई करू,असे आश्वासन दिले.आज (शुक्रवार) पंचायत समितीची मासिक सभा बहे येथील रामलिंग बेटाच्या नयनरम्य परिसरात सभापती रवींद्र बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, राहुल रोकडे, बी. के. पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सौ. सुवर्णाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बागणी येथील जि. प. शाळा नं. १ व कुरळप येथील शाळेने स्वच्छ, सुंदर शाळेचा पुरस्कार मिळवल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच आगीमध्ये म्हैस मृत झालेल्या ऐतवडे बुद्रुक येथील शेतकरी शौकत मुल्ला यांना १० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.डॉ. अशोक सुतार यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. ऊसतोड मजुरांच्या आरोग्य शिबिरांचा १५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होताच आरोग्य शिीबर आयोजित करू, असे सांगितले. बांधकाम विभागाची माहिती देताना आर. पी. चव्हाण म्हणाले, दलित वस्तीतील ४२ पैकी ३३ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे महिना अखेरीस पूर्ण होतील.शिक्षण विभागाच्या छाया माळी म्हणाल्या, शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. अंगणवाडी आयएसओ झाल्याप्रमाणे शाळाही व्हाव्यात, यासाठी ६ शाळांतील ६५ शिक्षकांनी बेळंकी शाळेची पाहणी करुन तसे प्रयत्न सुरू केले आहेत. एस. एस. पाटील यांनी शेती विभागाचा आढावा घेतला.रवींद्र बर्डे समारोप भाषणात म्हणाले की, परिस्थितीनुसार नवनवीन प्रश्न निर्माण होतात. इतर ठिकाणी जाऊन पहा, प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित आहेत. या परिसराला जयंत पाटील यांच्यासारखे द्रष्टे नेतृत्व लाभल्याने अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यावेळी पं. स. सदस्य सुभाष पाटील, जयकर नांगरे-पाटील, प्रकाश पाटील, सुनील पोळ, नंदकुमार पाटील, पप्पू शेळके,अरविंदबुद्रुक, जयश्री कदम, प्राजक्ता देशमुख, राजश्री माळी, राजेश्वरी पाटील, तपश्चर्या पाटील, शोभा देसावळे, प्रीती सूर्यगंध, अश्विनी गायकवाड उपस्थित होत्या. विठ्ठल पाटील, माणिकराव पाटील, सरपंच सुधीर रोकडे आदींनी बहे गावची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी केली. दीपकराव पाटील, बबनराव सावंत, अॅड. कृष्णराव पाटील, लव्हाजी देशमुख, रसूल लांडगे, आगारप्रमुख बाळासाहेब कांबळे, कालिदास पाटील, सुरेश पाटील, माधुरी पाटील, सरपंच संगीता पाटील, तानाजीराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आरोग्य विभाग सदस्यांकडून पुन्हा धारेवर
By admin | Updated: February 7, 2015 00:11 IST