सांगली : मारामारीच्या गुन्ह्यातील तपासात सहकार्य करण्यासाठी व न्यायालयात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी अटकेत असलेल्या संशयिताच्या भावाकडून दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.प्रताप बाबूराव थोरात (वय ४५, रा. आष्टा, सध्या मिरज) असे या हवालदाराचे नाव आहे. तो सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. आज, सोमवारी दुपारी ग्रामीण पोलीस ठाण्यातच त्याला लाच घेताना रंगेहात पकडले.अडीच महिन्यांपूर्वी बुधगाव (ता. मिरज) येथे दोन गटांत मारामारी झाली होती. याप्रकरणी नऊ संशयितांना अटक केली होती. यामध्ये कवलापुरातील एक संशयित होता. महिन्यापूर्वी यातील सात संशयितांची जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली होती. दोन संशयित अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये कवलापुरातील संशयिताचा समावेश आहे. त्याच्या भावाकडून थोरात याने, ‘तुझ्या भावाला तपासात मदत करतो, त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र लवकर पाठवितो,’ असे सांगून पंधरा हजाराची लाच मागितली होती. चर्चेअंती भावाने दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. कारवाईसाठी या विभागाचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले. पथकाने लावलेल्या सापळ्यानुसार संशयिताचा भाऊ रक्कम घेऊन आज दुपारी साडेबाराला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गेला. त्याच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारत असताना पथकाने थोरातला रंगेहात पकडले. थोरात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. तो बुधगाव, कवलापूर या दोन गावांचा बीट अंमलदार आहे. त्याला उद्या,मंगळवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. या कारवाईनंतर पोलीस ठाण्यात सन्नाटा पसरला होता. तीन वर्षांपूर्वीही ग्रामीण पोलीस ठाण्यात एका हवालदारास लाच घेताना पकडले होते. (प्रतिनिधी)
सांगलीत लाच घेताना हवालदारास अटक
By admin | Updated: July 1, 2014 00:40 IST