आष्टा : आष्टा पालिकेने कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीररित्या हडप केलेले भूखंड, तसेच शासकीय भूखंडावर केलेल्या विविध बेकायदेशीर बांधकामांबाबत पुराव्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख वीर कुदळे यांनी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीवर दोन जानेवारीपासून सुनावणी होणार आहे.आष्टा पालिकेला ३० गुंठे जागा शासनाने दिली असताना, धनगर तलाव बुजवून व त्यामधील सहा एकराचा भूखंड हडप करुन बेकायदेशीररित्या बांधलेले मच्छी मार्केट, भाजी मंडई, कोल्हाटी समाज घरकुले, शॉपिंग सेंटर, आष्टा पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी हडप केलेली घरकुले, मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत बेकायदेशीररित्या बांधलेली सातशे घरकुले, हुतात्मा स्मारकाच्या जागेतील वीस गाळ्यांचे बेकायदेशीर शॉपिंग सेंटर, दुधगाव रस्ता, चव्हाणवाडी येथे शासकीय जागेत बांधलेली शॉपिंग सेंटर्स, तसेच अकृषिक परवाना न घेता तासगाव रस्ता येथे बांधलेले शॉपिंग सेंटर, आंबेडकर तलावात बांधलेले बेकायदेशीर आंबेडकर भवन, मृत व्यक्तीच्या नावे बोगस करारनामा करुन कोटेश्वर देवस्थानच्या जागेत बेकायदेशीररित्या बांधलेली एक कोटीची पाण्याची टाकी, धनदांडग्यांनी लाटलेली विविध घरकुल योजनेतील घरकुले आदी १४ तक्रारींची सुनावणी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासमोर २ जानेवारीरोजी होत आहे. (वार्ताहर)
आष्ट्यात भूखंड हडप : शुक्रवारी सुनावणी
By admin | Updated: December 31, 2014 00:09 IST