सांगली : मुंबई साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जिजाऊ वस्तीस्तरीय संघ संस्थेच्या वतीने करण्यात आली. या वेळी महिलांनी मारुती चौकात निदर्शने करीत या घटनेचा निषेध नोंदविला.
संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. साकीनाका येथील घटना तर काळिमा फासणारी आहे. शक्तीसारखा कायदा अजनही अंमलात आलेला नाही. राजकीय नेत्यांवर बलात्काराचे आरोप होत आहेत. साकीनाका घटनेतील पीडिताला न्याय देण्याची गरज आहे. त्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात अलका कुलकर्णी, जयश्री भोसले, शीतल ऐनापुरे, छाया जाधव, राधाबाई रणदेव, अनिता उपळेकर, मीरा चौगुले यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.