लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीवाडी येथे धरण रोडवर एका शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू विक्रीवर सांगली शहर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात राजू भुपाल आवळे व गणेश भुपाल आवळे (दोघेही रा. धरण रोड, सांगलीवाडी) या भावांना अटक करत त्यांच्याकडून ५० हजार ९८० रुपये किमतीचा १६५ लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदीतही अवैधपणे दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार सांगली शहर पोलिसांचे पथक शुक्रवारी गस्तीवर असताना त्यांना सांगलीवाडीत हातभट्टी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने धरण रोडवरील शेतात जाऊन सायकलला हातभट्टी दारूची प्लास्टिक पिशवी अडकवून विक्री करणाऱ्यास ताब्यात घेतले. यासह त्याने लपवून ठेवलेला ४० लिटरचा दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक खंडेराव रंजवे, नीलेश बागाव, गुंडोपंत दोरकर, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.