लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील शंभर फुटी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी याच रस्त्यावर दलित महासंघाच्यावतीने शनिवारी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेविरोधात निदर्शनेही करण्यात आली.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोहिते म्हणाले की, शंभर फुटी रस्ता खड्डेमय बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांना, वाहनधारकांना या खराब रस्त्यामुळे त्रास होत आहे. रस्ते दुरुस्तीची वारंवार मागणी करुनही त्याची दखल महापालिकेने घेतली नाही. त्यामुळे महापालिकेविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. येत्या पंधरा दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोहिते यांच्यासह तासगाव तालुकाध्यक्ष प्रशांत केदार व अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.