लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सहकारतपस्वी दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ येत्या १६ सप्टेंबररोजी मुंबईत विधानभवनातील सोहळ्याने होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून, सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती शताब्दी समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात १६ रोजी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते यावेळी गुलाबराव पाटील यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष विश्वजित कदम, समिती सदस्य बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, शंभूराजे देसाई कार्यरत आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार, आमदार, पक्षांचे पदाधिकारी यांनाही निमंत्रित केले असून सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थित असणार आहे.
पाटील म्हणाले की, स्व. गुलाबराव पाटील यांनी राजकीय कारर्कीद सांगली जिल्ह्यातून सुरू केली. त्यानंतर त्यांनी राज्यपातळीवर आणि देशपातळीवर कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ मुंबईत करण्यात येत आहे. ‘प्रेरणोत्सव’ असे या सोहळ्याचे नाव आहे.