कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सतर्फे चेंबरच्या सभागृहात रविवार, दि.०७ फेब्रुवारी रोजी उद्योजकांसाठी वीज व ऊर्जा वापरातील बचत या विषयावर मुंबईचे सनदी लेखापाल महावीर जैन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील व माजी अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.
मालू म्हणाले, महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा २० ते ५० टक्के जास्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग तुलनात्मकदृष्ट्या स्पर्धात्मक होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करणे हा शक्य असलेला पर्याय आहे. अनेक उद्योगांमध्ये वीज वापर जास्त प्रमाणात असतो. तेथे वीज हा अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल असतो. अशा ठिकाणी वीज वापर कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
यावेळी पाटील म्हणाले की, आपण उद्योगांत अनेक प्रकारची ऊर्जा वापरतो. वीज, उष्णता, वाफ आदी अनेक प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो. हा सर्व वापर किमान पातळीवर आणणे, त्याद्वारे उत्पादन खर्च कमी करणे. यासाठी सर्व उपाययोजना सुचविणे व त्या अमलात आणण्यासाठी सर्व प्रयत्न व सहकार्य करणे. यासाठीच महावीर जैन हे काम करीत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष पाटील, माजी अध्यक्ष मालू यांनी केले आहे.