सांगली : पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण, शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. त्यासाठी भाज्यांना खूप भाव येतो. परिणामी भाज्यांच्या किमती या आठवड्यात गगनाला भिडतात. होलसेलमध्ये गवारला ५५, तर किरकोळ विक्रीसाठी ८० रुपये किलो दर मिळत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक आणि दरही वाढल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दर नसल्यामुळेही गेल्या पंधरा दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकला. यातूनच सध्या भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. गवार, वांगी किलोला ७५ ते ८० रुपये दर आहे. सिमला, श्रावण घेवडा, भेंडी, दोडका, भोपळा, टोमॅटोचे दरही चांगलेच वाढले आहेत.
चौकट
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
भाजीपाला - होलसेल दर - किरकोळ विक्रीदर
भोपळा - १५ - ३०
गवार - ५५ - ८०
कारली - १० - २०
वांगी - ५० - ७५
टोमॅटो - १५ - २०
बटाटे - १५ - २०
फ्लॉवर - ४० - ५०
सिमला - ३० - ५०
श्रावण घेवडा ४५ - ६०
भेंडी ३० - ४५
दोडका १५ - २५
चौकट
मागणी वाढली
पितृपंधरवड्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांतही पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. यामुळे घरोघरी जेवणावळी सुरू असल्याने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाला बाजारात २०० ते ३०० क्विंटल भाज्यांची आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी अधिक आहे; परंतु पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
चौकट
व्यापारी काय म्हणतात...
कोट
पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे आवक घटली आहे, तसेच पितृपंधरवड्यामध्ये भाजीपाल्याचे दर नेहमीच वाढत आहेत. यामुळे सध्या भाजीपाल्यांचे ३० ते ३५ टक्के दर वाढले आहेत. हे दर महिनाभर तरी टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे.
-शिवाजी पाटील, भाजीपाला विक्रेते, सांगली
कोट
पितृपंधरवड्यात नेहमीच भाज्यांना मागणी असते; पण यावर्षी भाजीपाल्याची आवकही घटली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. हे दर भविष्यात काही दिवस तरी कायम राहतील, असा अंदाज आहे.
-किशोर सगरे, भाजीपाल्याचे होलसेल व्यापारी
चौकट
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
कोट
कोरोनामुळे भाजीपाला विक्रेते घरीच येत असल्यामुळे तेथूनच आम्ही घेतो. मंडईपेक्षा जादा दर आहे; पण किरकोळ भाजीसाठी मंडईला जाणे परवडत नाही. पेट्रोलचे दरही वाढल्यामुळे घरी येणाऱ्यांकडूनच भाजीपाला खरेदी करणे परवडत आहे.
-अश्विनी कुंभार, गृहिणी
कोट
आमच्या परिसरात कसबेडिग्रज, तुंग, कवलापूर परिसरातील शेतकरीच भाजीपाला विक्रीसाठी येत आहेत. ताजी भाजी आणि खात्रीशीर भाजी मिळत असल्यामुळे पैशाचा विचार न करता त्यांच्याकडूनच खरेदी करते.
-मेघा जोशी, गृहिणी