सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील एका भंगार व्यावसायिकावर केंद्रीय जीएसटीच्या सांगली पथकाने बुधवारी छापा टाकला. बोगस पावतीद्वारे सुमारे पन्नास लाख रुपयांचा कर चुकविल्याचा संशय पथकाला आहे. रात्री उशिरापर्यंत व्यावसायिकाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय जीएसटी पथकातर्फे देशभरात छापासत्र सुरू आहे. बोगस पावती दाखवून जीएसटी चुकवणाऱ्यांवर आत्तापर्यंत भारतात अडीचशेहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतभर ही कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगली पथकानेही जिल्ह्याभर विशेष मोहीम आखली आहे.
कोल्हापूर रस्त्यावरील एक भंगार व्यावसायिक बोगस पावती देऊन जीएसटी चुकवत असल्याची माहिती गोपनीय पथकास मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पथकाने त्याच्यावर छापा टाकला. दुकानातील पावतीची तापसणी करण्यात आली. त्यातून सुमारे पन्नास लाखांचा जीएसटी कर चुकवल्याचेही प्रथमदर्शनी समोर आल्याचे समजते. दुकानातील कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. या छाप्याबाबत केंद्रीय जीएसटी विभागाने गोपनीयता पाळली आहे. याबाबत कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही. शहरात जीएसटी विभागाने कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.