सांगली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पुन्हा एकदा जिल्ह्याची चिंता वाढवत असताना, आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढतच चालला आहे. त्यातही प्रत्यक्ष कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी वाढली आहे. त्यातही उपचार करणारे डॉकटर, कर्मचारी आता रोज घरी जात असल्याने कुटुंबीयांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काेरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोविड सेंटरही सुरू करण्यात आल्याने उपचाराची सोय होत असली तरी आरोग्य कर्मचाऱ्यांच्याच आरोग्याची काळजी कुटुंबीयांना आहे. गेल्या वर्षी कोरोनाची लाट आली होती. त्यावेळी कोरोना ड्यूटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच दिवस क्वारंटाईन केले जात होते. आता मात्र, कर्मचारी रोज घरी जात आहेत. त्यामुळे कुटुंबीयांचीही धाकधूक वाढली आहे.
चौकट
मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, कोविड रुग्णांशी संपर्क आल्याने आम्हालाही संसर्ग होण्याची भीती आहे; पण आमच्या कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अनेक वेळा आम्ही कुटुंबापासून सुरक्षित अंतरावरच राहत आहोत. त्यातही लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी लागते आहे. पीपीई किटसह उन्हाळ्यात सेवा देताना त्रास हाेत असला तरी कर्तव्य पार पाडत आहोत.
चौकट
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या महिला कर्मचारी व पुरुष कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनेक सहकारी घरी सोय होत नसल्याने रुग्णालयाच्या परिसरातच राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. तरीही कुटुंबांपासून दूर असल्याने त्यांना काळजी वाटते आहे. त्यातही लहान मुले घरात ठेवून आल्याने त्यांच्याही आरोग्याची काळजी वाढत आहे.
कोट
पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. रुग्णालयात कामावर असताना चिंता लागून राहते. प्रशासनाने सुरक्षाविषयक सोयी केल्या असल्या तरी शेवटी कुटुंबातील सदस्य म्हणून काळजी ही आहेच.
- सुलोचना धेंडे, आरोग्य कर्मचाऱ्याची आई
कोट
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्याही वेळा वाढल्या आहेत. त्यामुळे जरी सेवा बजावून ते घरी आले तरीही त्यांची काळजी घ्यावी लागते. पोषक आहाराबरोबरच पुरेशी झोप, मानसिकता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.
- रचना राजपूत
कोट
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी प्रशासनाने सर्व रुग्णांवर उपचारांचे योग्य नियोजन केले आहे. आता तालुकास्तरावर कोरोना केअर सेंटरही सुरू झाले आहेत. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्यात काेणी बाधित आढळल्यास त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले जाते.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक