दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय अज्ञातांनी पेटवले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, गट कार्यालय पेटवल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
यंदा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले; परंतु कारखाने सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी तीन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी तुकड्यामध्ये एफआरपी देण्यास सुरुवात केली आहे. राजारामबापू (साखराळे), राजारामबापू (वाटेगाव युनिट), सर्वोदय (कारंदवाडी), कुंडल येथील क्रांती या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २५०० रुपयाने देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय एकरकमी एफआरपीसाठी पेटविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आमदार अरुण लाड यांनी मागेल त्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कम देण्याचे सांगितले होते.
वसंतदादा कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसमोरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यावेळी कंपनीने एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले तसेच आतापर्यंत ज्यांना पहिला हप्ता दिला, त्यांना दुसरा हप्ता दहा दिवसांत देण्याचे मान्य केले. त्यामुळे आतापर्यंत पाच कारखाने एकरकमीसाठी तयार झाले आहेत. या परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे सावळवाडी येथील गटकार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे स्पष्ट झाले. रविवारी रात्री दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र या आंदोलनाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
फाेटाे : ११ दुधगाव १ : सावळवाडी (ता. मिरज) येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत राजारामबापू साखर कारखान्याच्या गटकार्यालयाचे नुकसान झाले.