इस्लामपूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नेर्ले ते पेठनाका दरम्यान दोन वाहनांतून आलेल्या १२ जणांच्या टोळक्याने वाळू भरलेला १४ चाकी ट्रक अडवून त्यातील चालक आणि क्लिनरला लोखंडी गजाने मारहाण करून हा पंचवीस लाखाचा ट्रक चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडला.
याबाबत क्लिनर बसवराज आनंदराव पाटील (वय ३२, रा. जाडरबोबलाद, ता. जत) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह हणमंतराय संगप्पा माडग्याळ (३६, रा. जाडर बोबलाद) जखमी झाले आहेत. बसवराज यांचा डावा हात मोडला असून, त्यांच्या डोक्यातही जखम आहे. तसेच हणमंतराय यांच्या डोक्यातही लोखंडी गजाने मारले आहे. या दोघांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अर्जुन धर्माण्णा बिरादार (रा. मुडशिंगे, ता. करवीर) यांच्या मालकीच्या १४ चाकी ट्रकवर (केए २३ बी १५१५) हे दोघे काम करतात. ९ मार्चला ते नंदूरबार येथील सारंगखेडा येथून वाळू भरून कोल्हापूरकडे निघाले होते. १० मार्चच्या रात्री नेर्ले ते पेठनाका दरम्यान पाठीमागून माेटार (एमएच १० सीक्यु ७८९३) व आणखी एका चारचाकी वाहनातून आलेल्या बारा जणांच्या टोळक्याने चालक व क्लिनरला ट्रकमधून बाहेर ओढत जबर मारहाण केली. दोघांना एका वाहनात घेऊन त्यांना तुंग फाट्याच्या पुढे असणाऱ्या पेट्रोल पंपावर सोडून दिले आणि १४ चाकी वाळूने भरलेला ट्रक जबरदस्तीने चोरून नेला. इस्लामपूर पोलिसात बसवराज पाटील यांनी अज्ञात दहा ते बारा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.