घाटनांद्रे : कवठेमहांकाळच्या घाटमाथ्यासह तालुक्यातील जवळपास पन्नास ते साठ टक्के द्राक्षबागा सध्या विक्री योग्य बनल्या आहेत. परंतु बाजारातील दरच कोसळल्याने व दलालानीही पाठ फिरविल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.
म्हैसाळ याेजनेचे पाणी आल्यानंतर नगदी पीक म्हणून दुष्काळी भागातील शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळत आहे. आपसूकच द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले व बळीराजाचा आर्थिक कणा बनले. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, वारा, वादळ, रोगराई अशा अनेक संकटांवर मात करत करत जगवलेल्या या द्राक्षबागांना चालू वर्षी उत्पादन चांगले आहे. मात्र, दर कोसळल्याने व मालाचा उठाव थांबल्याने एक नवे संकट ओढवले आहे.
सध्या तालुक्यातील पन्नास ते साठ टक्के द्राक्षबागा या विक्रीयोग्य बनल्या आहेत. परंतु दरच नसल्याने व दलालही उत्साह दाखवत नसल्याने या तयार मालाचे काय करायचे हा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
सध्या द्राक्षाचा दर चार किलाेच्या पेटीस १२५ ते १५० रुपयांवर आहे. व्यापारी दलालही नेहमीप्रमाणे विविध कारणे सांगून दर पाडून मागत आहेत. विविध संकटांचा पूर्वानुभव लक्षात घेता बळीराजाही येईल त्या दराला द्राक्षबागा देण्यास तयार होत आहे. अद्याप शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. याेग्य दर न मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीची तयारी ठेवली आहे.
फाेटाे : १० घाटनांद्रे १
ओळ : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बहुतांश द्राक्षबागा तयार झाल्या आहेत.