पनामाचे मालवाहतूक जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात अडकून तिरके झाल्यामुळे जलवाहतूक ठप्प झाली आहे. त्या कोंडीत युरोप आणि रशियाकडे निघालेल्या सांगली जिल्ह्यातील द्राक्षाच्या ६० कंटेनरचा समावेश आहे. या कंटनेरमध्ये ९०० टन द्राक्षे होती. ही द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत जाणे आणि तेथील रिकामे कंटेनर परत येणे गरजेचे होते. जिल्ह्यातील निर्यातीचे ३० टक्के शिल्लक द्राक्षे येथेच अडकून पडली होती. त्यामुळे निर्यातदार आणि द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडला होता. अडकलेले जहाज सोमवारी निघाल्यामुळे निर्यातीची शिल्लक द्राक्षे पुन्हा युरोपला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवड्यात द्राक्षांचे दर वाढण्यास मदत होणार आहे.
चौकट
ठरलेलाच दर द्या : महादेव पाटील
मालवाहतूक जहाज अडकल्याचे कारण देत निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ठरल्यापेक्षा दर कमी घ्यावा लागेल, अशा सूचना दिल्या होत्या. आता द्राक्ष उत्पादकांनी व्यापाऱ्यांना फोन करून, ‘अडकलेले जहाज निघाले, ठरलेला दर दिलाच पाहिजे’, असे ठणकावून सांगितले आहे, असे द्राक्ष उत्पादक महादेव पाटील यांनी सांगितले.
चौकट
द्राक्षाचे दर वाढणार
परदेशासह देशांतर्गतही द्राक्षाला मागणी वाढल्यामुळे मागील आठवड्यात चार किलोच्या पेटीला १०० ते १२५ रुपये दर होता. या दरात सोमवारी २० ते २५ रुपये वाढ झाली. सोलापूर, नाशिकला द्राक्षाचे उत्पादन कमी असल्यामुळे येत्या पंधरा दिवसांत १५० ते १८० रुपये दर मिळेल, असा अंदाज आहे.