जत : जत नगर परिषद शौचालयाचे उर्वरित अनुदान देण्यासाठी मागील चार वर्षांपासून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घर तेथे शौचालय या भारत सरकारच्या धोरणास खो घालण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वनिता अरुण साळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जत शहरात घर तेथे शौचालय, उपक्रम चार वर्षांपूर्वी पालिकेच्यावतीने राबविण्यात आला होता. नागरिकांनी हात उसने पैसे घेऊन व कर्ज काढून शौचालय उभे केले आहे. राजकीय सत्ता संघर्षातून यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर नागरिकांना अनुदान मिळाले नाही. दरम्यान, काही नागरिकांना एक तर कांही जणांना दोन हप्ते मिळाले आहेत. उर्वरित नागरिकांना एकही हप्ता मिळाला नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाकडून आलेले अनुदान नगर परिषदेच्या खात्यावर मागील ४ वर्षे पडून आहे; परंतु ते नागरिकांना मिळेनासे झाले आहे, अशी तक्रार वनिता साळे यांनी केली आहे.
चौकट
सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
जत नगर पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची संयुक्त सत्ता आहे. साळे यांनी आंदोलनाचा इशारा देऊन सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे, अशी चर्चा जत शहरात होऊ लागली आहे.