सांगली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे बाजारपेठेसही अडचणी जाणवू लागल्या आहेत. आवकीवरील परिणाम या आठवड्यातही कायम राहिल्याने धान्याचे दर प्रतिक्विंटल १२० ते १७० रुपयांनी वाढले आहेत तर भाज्यांची आवक मर्यादित असल्याने बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर कायम आहेत. आंब्याची आवक वाढत असलीतरी कर्नाटकी आंब्याचेच अतिक्रमण जास्त दिसत आहे.
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्रच खाद्यतेलाच्या आवकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दर आठवड्याला दर वाढतच आहेत. या आठवड्यात खाद्यतेलांच्या दरात सरासरी २५ रुपयांनी वाढ झाली आहे. तरीही आवक कमीच आहे. नवीन गहू बाजारात येत असला तरी जुन्या गव्हास ग्राहकांची मागणी अधिक आहे.
फळविक्रीला असलेल्या अडचणी लक्षात घेता आंबा सोडून इतर फळाला तितकी मागणी नाही. आणि ग्राहकही जादा फळांची खरेदीकडे कल दिसून येत नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी वाहनांतून फिरत विक्री सुरू केली आहे.
चौकट
कर्नाटकी आंबाच अधिक
पंधरवड्यापासून आंब्याची आवक वाढत असलीतरी हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची आवक वाढली आहे. बहुतांश ठिकाणी कोकणचा आंबा म्हणूनच या आंब्याची विक्री होत आहे. मात्र, कर्नाटकातील आंब्याची चव अनुभवी ग्राहक ओळखत असल्याने कोकणातील आंब्याचा दर जादा असलातरी तोच आंब्यास पसंती देत आहेत. मात्र, कोकणासह स्थानिक आंब्याचीही आवक घटली आहे.
चौकट
किराणा बजेट पुन्हा कोलमडले
महिन्याच्या सुरुवातीला अनेक घरांमध्ये महिनाभरासाठी किराणा सामान खरेदी केले जाते. मात्र, या आठवड्यात खाद्यतेल, डाळी, धान्य, मसाल्यांसह इतर पदार्थांचेही दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट मात्र, कोलमडले आहे.
चौकट
वांगी, बटाटा महागला
सर्वाधिक मागणी असलेल्या वांगी आणि बटाटा दरात पुन्हा वाढ झाली आहे. सध्या भाज्यांमध्ये शेवग्याची चांगली आवक आहे. काकडी, लिंबूला मागणी असलीतरी दर वाढले आहेत. कोथंबिरीच्या दरातही वाढ झाली आहे. गवारी, दोडक्याची आवक मात्र कमी झाली आहे. पालेभाज्या तर मिळत नसल्याचे चित्र आहे.
कोट
आंबा खरेदी करताना ग्राहकांनी आपल्या आवडीनुसार खरेदी करावा. कर्नाटकातील आंबा चवीने काहीसा तुरट असलातरी दर परवडत असतो. यंदा कोकणातील आंब्याची म्हणावी तशी आवकच नाही. तरीही ५०० रुपये पेटी दराने चांगला आंबा बाजारात मिळत आहे.
इब्राहिम बागवान, व्यापारी
कोट
उन्हाळा वाढत असल्याने काकडी, लिंबूला मागणी आहे. पालेभाज्यांची ग्राहकांकडून मागणी असलीतरी तेवढी आवक होत नाही त्यात घरोघरी फिरून विकताना भाज्या खराब होत आहेत त्यामुळे आम्ही फळभाज्या जास्त विक्री करत आहोत.
सचिन पाटोळे, विक्रेता
कोट
वातावरणात बदल होत असल्याने मिरची मसाल्याचे काम करून घेत आहे. मिरचीचे दर खूपच वाढले आहेत. त्यात बाजारपेठ बंद असल्याने ठरावीक वेळेत खरेदी करताना अनेक अडचणी येत आहेत. तरीही किराणा असो, भाज्या असो खरेदी करावी लागणारच आहे.
नम्रता पवार, गृहिणी