सांगली : सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी सरकारचे नाते जोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवशाहीऐवजी केवळ ठोकशाही पद्धतीने राज्य चालविण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्यांचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. एका मंत्र्याच्या बंगल्यात तरुणाला मारहाण केली जाते. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारमधील मंत्री व त्यांचे नातलग बदनाम होत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी दडपशाहीचे दर्शन घडवित आहे. शिवरायांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यामध्ये जे काही चालले आहे, ते राज्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे.
निष्क्रियतेचीही सरकारने परिसीमा गाठली आहे. कोरोनाच्या उपाययोजनांवर एक रुपयाचाही खर्च राज्य सरकारने केला नाही. पीपीई किटपासून लसीकरणापर्यंतचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे बोट करण्याचा कोणताही अधिकार नाही. या सरकारने छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला, मजूर, कामगार, कर्मचारी यांच्यासाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारची सध्याची अवस्था ही 'नाचता येईना, अंगण वाकडे' अशी झाली आहे.
पूजा चव्हाणच्या प्रकरणात या सरकारने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स का तपासल्या गेल्या नाहीत? सरकार बहिरे झाले आहे का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
पवारांना माझ्याशिवाय करमत नाही
पाटील म्हणाले की, शरद पवारांना मी काही त्यांच्याविषयी बोललो नाही, तर करमत नाही. त्यामुळे मी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काहीतरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत.
पडळकरांनी नीट बोलावे
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे बोलायचे आहे, जे करायचे आहे ते पडळकरांनी करावे, मात्र नीट बोलावे. धनगर समाजाला या राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांकडून काय त्रास झाला आहे, हे पडळकरांनाच माहीत आहे. त्यामुळे ते आक्रमकपणे भांडतात.