विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त संपूर्ण भारतभर विखुरलेल्या मराठी व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच गलाई व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.
सोने-चांदी गलाई व्यवसायाला लघुउद्योगाचा दर्जा देऊन या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी, अशी मागणी काशी मराठा समाजाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी उत्तरप्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी राज्यपाल नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे सूचित केले होते.
त्यामुळे मंत्री गडकरी यांनी सोने-चांदी गलाई उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिल्ली येथे चर्चेसाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी काशी मराठा समाजाचे अध्यक्ष संतोष पाटील वाराणसी, उत्तरप्रदेश मराठी समाज महासंघाचे उमेशकुमार पाटील, अखिल भारतीय सोने-चांदी गलाई संघटनेचे समन्वयक उदय शिंदे यांच्यासह अन्य शिष्टमंडळाने मंत्री गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यावेळी वाराणसीचे उद्योजक संतोष पाटील व लखनौ येथील उमेशकुमार पाटील यांनी सोने-चांदी गलाई व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे तीन लाखांहून अधिक मराठी कुटुंबीयांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमच्या व्यवसायाला लघुउद्योगाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, अशी मागणी केली.
त्यानंतर मंत्री गडकरी यांनी संपूर्ण भारत व परदेशांतही मराठी गलाई बांधव विखुरले असल्याची कल्पना मला आहे. त्यांचे प्रश्न कितीही वर्षे प्रलंबित असले तरी ते तातडीने सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करीत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
चौकट :
नितीन गडकरींचा वाराणसी दौरा...
सोने-चांदी गलाई व्यवसायिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी गडकरी पुढील आठवड्यात वाराणसी दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत पुन्हा एकदा मराठी गलाई व्यावसायिकांशी चर्चा करून प्रश्नांवर नक्कीच तोडगा काढतील, अशी अपेक्षा वाराणसीचे उद्योजक संतोष पाटील यांनी व्यक्त केली.
फोटो - ०५०२२०२१-विटा-गडकरी बैठक : दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमेवेत सोने-चांदी गलाई व्यवसायाच्या प्रश्नांबाबत शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी उद्योजक संतोष पाटील, उमेश पाटील, उदय शिंदे उपस्थित होते.