सांगली : महापालिकेच्या प्रभाग समिती दोनकडून लिफाफा पद्धतीने निविदा मागविल्या होत्या, पण या निविदा संकेतस्थळावर दिसतच नव्हत्या. त्या कधी अपलोड करण्यात आल्या, याचीही माहिती नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत गोलमाल असल्याचा आरोप नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केला.
साखळकर म्हणाले की, प्रभाग समिती दोन अंतर्गत विविध कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. १८ ऑगस्ट रोजी दुपारी बारापर्यंत निविदा अर्ज खरेदीची मुदत होती, तर दुपारी तीनपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार होत्या, पण दुपारपर्यंत ही निविदा संकेतस्थळावर दिसत नव्हती. याबाबत सिस्टिम मॅनेजरकडे चौकशी केली असता त्यांनी फारशी माहिती दिली नाही. निविदा कधी अपलोड केल्या हेही कळत नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेत गोलमाल आहे. या निविदेत मिरज विभागीय कार्यालयाच्या रंगकामाचाही समावेश केला आहे. वास्तविक प्रभाग दोनमध्ये प्रभाग चारमधील कामाचा कसा समावेश होऊ शकते, असा सवालही त्यांनी केला.