फोटो : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी लावलेल्या पहिल्या वृक्षाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी भाई संपतराव पवार, सु. धों. मोहिते, सरपंच प्रकाश मोरे, भगवान नालगे आदी उपस्थित होते. (छाया : रुपाली फोटो, आसद)
देवराष्ट्रे : वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश सागरेश्वर अभयारण्य उभारणीतून दिला आहे. अण्णांनी अभयारण्यात लावलेल्या पहिल्या झाडाचा ५० वा वाढदिवस साजरा करीत आहोत. झाड हेच माणसाचे संरक्षण शस्त्र बनले आहे, असे प्रतिपादन क्रांती स्मृतीवनाचे प्रवर्तक संपतराव पवार यांनी केले.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी लावलेल्या पहिल्या ‘कांचन’ वृक्षाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा केला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी मोहिते कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
पवार म्हणाले, वृक्षमित्र धों. म . मोहिते यांनी लोकसहभाग आणि शासनाच्या सहकार्यातून सागरेश्वरच्या उजाड माळरानावर वनराई फुलवली. अण्णांच्या आठवणींना उजाळा देतानाच क्रांती स्मृतीवनाची निर्मिती त्यांच्या विचार प्रेरणेतून झाली आहे.
दत्तात्रय सपकाळ यांनी स्वागत केले. रानकवी सु. धों. मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद महिंद यांनी आभार मानले.
देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, कुंभारगावचे सरपंच भगवान नालगे, वनक्षेत्रपाल वर्षदा कानकेकर, पांडुरंग मोहिते, बाळासाहेब मोहिते, प्रा. रोहित मोहिते, संदीप नाझरे, प्रमोद महींद, जमीर सनदी, रोहित घोरपडे, वनरक्षक आर. एस. पाटील, सुनील शिंदे उपस्थित होते.