फोटो ०४ संतोष ०५
सांगलीत मुख्य रस्त्यांवर गणेशोत्सवासाठीच्या साहित्यांचे स्टॉल लागले आहेत.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणेशोत्सव तोंडावर आल्याने बाजारपेठेत उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यांवर सजावटीच्या साहित्याचे स्टॉल लागले आहेत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदा चांगल्या उलाढालीची व्यावसायिकांना अपेक्षा आहे.
दत्त मारुती रस्ता, पंचमुखी मारुती रस्ता, मिरज रस्ता, बसस्थानक परिसर, पटेल चौक, हरभट रस्ता आदी परिसरात उत्सवी साहित्याची गर्दी झाली आहे. रोषणाई केलेले मखर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. कृत्रिम फुलांचीही मोठी रेलचेल आहे. घरगुती उत्सवासाठी छोटे तयार मंडप उपलब्ध आहेत. बाप्पांसाठी आसन, शेले, आयुधे, मणीहार, कृत्रिम फुले, फळे यांचे स्टॉल सजले आहेत. यंदा गणेशमूर्तींची उंची कमी असल्याने सजावटीचे साहित्यही त्याच उंचीचे आहे.
चौकट
बाप्पांच्या स्वागतासाठी...
रंगीबेरंगी दिवे, बाप्पांची आभुषणे, सोन्या-चांदीचे दागिने, शोभेच्या व सजावटीच्या वस्तू, कृत्रिम फुलांच्या माळा, दिव्यांच्या स्वरुपातील अगरबत्ती, पणत्या व समया, आरतीसंग्रहाचे स्टेरिओ असे नानातऱ्हेचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. गेली दीड वर्षे चीनसोबतच्या व्यवसायात भारताचे संबंध चांगले नाहीत, तरीही चायनीज रोषणाईचा वरचष्मा कायम आहे. सजावटीच्या अन्य चायनीज साहित्याचीही रेलचेल आहे.
चौकट
सजावटीच्या साहित्याच्या किमती
थर्माकोलचे मखर २०० ते २००० रुपये, लाकडी पाट १०० ते ३००, किरीट १०० ते २०००, शेले २० ते २००, पूजेची थाळी १५० ते ३००, सोनेरी सोंड २५० ते १०००, कर्णफुले १५० ते ६००, चंदेरी दुर्वा हार १०० ते ४००, चंदेरी उंदीरमामा ३०० ते १०००, मोदक ५० ते ४००, फळे ५० ते ३००, गदा १५० ते ३००, कमळफूल १०० ते ५००, त्रिशूल १०० ते ३००
कोट
बाजारपेठेला रात्री दहापर्यंत परवानगी दिल्याचा फायदा झाला आहे. सध्या घाऊक ग्राहकांची गर्दी आहे. यंदा गणेशोत्सवात चांगल्या उलाढालीची अपेक्षा आहे. चायनीज माल नव्याने फार खरेदी करता आलेला नाही. गेल्यावर्षीचीच खरेदी बाजारात आहे.
- दीपेश शहा, व्यावसायिक