सांगली : रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणी-महिलांविषयी आक्षेपार्ह बोलत चाळे करणाऱ्यांवर आता कारवाई सुरू आहे. कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने या रिकामटेकड्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी अन्य ठिकाणी उभे राहून त्रास देणाऱ्यांना आता निर्भया पथकाकडून प्रसाद दिला जात आहे. त्यामुळे शहरात रोडरोमिओंकडून छेडछाडीचे प्रकार कमी झाले आहेत.
कामानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या सुरक्षेविषयी पालकांत नेहमीच काळजी असते. सध्या मात्र असे प्रकार घटले आहेत. शहरातील प्रमुख महाविद्यालयाबाहेर असे प्रकार नेहमी होत असत. परंतु, सध्या शाळा महाविद्यालयेच बंद असल्याने चमकोगिरी करणाऱ्यांची गोची झाली आहे. तरीही महिला पथकाकडून संपूर्ण शहरात पेट्रोलिंग करण्यात येते. या वेळी कोणती तक्रार आल्यास संबंधित टोळक्याला थेट पोलीस ठाण्यात आणून कारवाई केली जात आहे.
चौकट
प्रमुख चौक आणि टोळक्यांचे अड्डे
छेडछाडीच्या उद्देशाने कमी, मात्र हुल्लडबाजी करण्याच्या उद्देशाने अनेक तरुण आजही प्रमुख चौकांत थांबलेले असतात. विशेषत; गर्दीच्या बाजारपेठेत तर टोळके कायम असते. दुचाकीवर बसून माव्याच्या पिचकाऱ्या टाकत तरुणांचा हा कारभार चाललेला असतो. पोलिसांनी अशांवरही कारवाई केली असली, तरी त्यांचा उपद्रव कायम आहे.
चौकट
कोरोना कालावधीअगोदर कॉलेज कॉर्नर, आमराई, राजवाडा चौक परिसरात रोडरोमिओ थांबलेले असत. मात्र, निर्भया पथकाची चाहूल लागताच धूमही ठोकत होते. काॅलेज परिसरात विनाकारण गर्दी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी जागेवरच शिक्षा देऊन पायबंद घातला होता.
चौकट
छेड काढणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
महिला सुरक्षाविषयी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम नेहमीच सतर्क असतात. त्यामुळेच निर्भया पथकाकडून नियमित आढावा घेत शहरातील प्रमुख चौकांत पथकातील कर्मचारी थांबलेले असतात.
चौकट
निर्भया पथकाकडून गस्त
जिल्हा पोलीस दलाकडून निर्भया पथक कार्यन्वित करण्यात आले असून, त्यांना गस्तीसाठी खास वाहनाची सोय आहे. त्यामुळे गर्दी असेल त्या वेळी साध्या वेशातील पथकातील महिला कर्मचारी सुरक्षेविषयक आढावा घेत असतात.
चाैकट
प्रत्येक पोलीस ठाण्यात सखी डेस्क
तरुणी, महिलांवरील अन्याय अथवा छेडछाडीसह अन्य प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष सखी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातील महिला कर्मचारी छेडछाडीसह अन्य तक्रारींची दखल घेतात.
कोट
निर्भया पथकाकडे तक्रारी आल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात येते. कोरोनामुळे असलेले निर्बंध शिथिल होत असल्याने आता पथकाकडून गस्तही वाढविण्यात येत आहे. गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक, एलसीबी