आटपाडी : कामथ (ता. आटपाडी) येथे एमआयडीसी होण्यासाठी शेतकऱ्यांनी १०० हेक्टर जमीन द्यावी, एमआयडीसीच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यात औद्योगिक क्रांती घडेल, असे आवाहन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी केले.आटपाडीत एमआयडीसी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी प्रयत्न केले. त्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी कामथ येथे मारुती मंदिरात शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, मुढेवाडी ते जांभुळणी रस्त्यावर एमआयडीसी उभी करण्यासाठी योग्य जागा आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू आहे. जवळ मोठा साठवण तलाव आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध करणे शक्य आहे. आटपाडीपासून जवळ अंतरावर हे ठिकाण आहे. जमिनी देऊन आटपाडी तालुक्याच्या विकासासाठी आपण योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार मिळणार असून, यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. पडळकरांच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जमीन देण्याची तयारी दर्शविली. यावेळी सरपंच सुनील सरक, देवीदास कोकरे, दशरथ कोकरे, हणमंत वळकुंडे, नारायण सरक, एल. ए. सरक, वसंतराव सरक, सुरेश महाडिक, शिवाजी माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चागेली अनेक वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या आटपाडी तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त शुक्रवारच्या अंकात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त दिवसभर भाजपच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यात सोशल मीडियावरून व्हायरल होऊन चर्चेचा विषय ठरले.
कामथमध्ये १०० हेक्टर जमीन द्या
By admin | Updated: September 10, 2016 00:38 IST