इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील एका घरात घुसून दारूच्या नशेत असणाऱ्या चौघा युवकांनी १९ वर्षीय युवतीकडे मोबाइल नंबरची मागणी करत तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली. बहिणीस सोडविण्यासाठी आलेल्या चुलत भावालाही या टोळक्याने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडला.
याबाबत पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुरेश संजय पवार, विश्वजित हणमंत पाटील, रणजीत हणमंत पाटील आणि रवी ऊर्फ अभिजित भरत पाटील अशा चार जणांविरुद्ध विनयभंगासह घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पीडित युवती ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. हे टोळके तिला गेल्या दीड वर्षापासून त्रास देत आहे. युवती बाहेर पडल्यावर तिचा पाठलाग करणे, अश्लील शेरेबाजी करत होते. अनेक वेळा समज देऊनही हा त्रास सुरूच होता.
शुक्रवारी रात्री हे चौघे या युवतीच्या घरात घुसले. तिला शिवीगाळ करत तिचा मोबाइल नंबर मागू लागले. यातच एकाने हात पकडून तिचा विनयभंग केला. युवती आणि तिची आई या चौघांना घराबाहेर जा, असे सांगत असतानाही ते आक्रमक होते. आरडाओरडा झाल्यावर शेजारील युवक आणि युवतीचा चुलत भाऊ तेथे आले. यावेळी चौघांनी तिच्या भावास मारहाण करून पलायन केले. पोलीस हवालदार रुपाली सुतार अधिक तपास करीत आहेत.