तासगाव : येथील नगर परिषदेतर्फे तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या कस्तुरबा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण करून हे रुग्णालय कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णांच्या उपचारांसाठी सज्ज करा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.
नगर परिषदेतर्फे तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टिस्पेशालिटी रुग्ग्णालयाची पाहणी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. काटकर, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी ए.एस. सूर्यवंशी, तासगाव नगर परिषदेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक प्रताप घाटगे, नगर अभियंता एम.एम. नदाफ, सल्लागार अभियंता भालचंद्र सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी करून इलेक्ट्रिक, ऑक्सिजन प्लांट उभारणी, फायर फायटिंग सुविधा, बेडस्, आयसीयू युनिट, लहान मुलांकरिता वॉर्ड आदी सुविधा विहित निकषाप्रमाणे कराव्यात, अशा सूचना संबंधितांना दिल्या. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फतही आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील.
हे रुग्णालय सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करून महिनाभरात सज्ज होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेडचे नियोजन असून, यामध्ये एक वॉर्ड लहान मुलांकरिता असणार आहे, तसेच ६ के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.