जत : खैराव (ता. जत) येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दीपक बाळू ढगे यांचे राहते घर शनिवारी दुपारी जळून खाक झाले. यात रोख एक लाख ४० हजार रुपयांसह सोने व संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार विक्रम सावंत यांनी प्रापंचिक साहित्य देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे.
खैराव येथे दीपक ढगे यांचे गावालगत घर आहे. शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला. भीतीने सर्वजण बाहेर पळाले. काही कळायच्या आतच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे काही वेळातच संपूर्ण घराला आगीने वेढले. या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख एक लाख ४० हजार रुपये, तीन तोळे सोने, दीड लाख रुपयांचे संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच आमदार विक्रम सावंत, पंचायत समिती माजी सभापती बाबासाहेब कोडग, खैराव ग्रामपंचायत सरपंच राजू घुटूकडे व कोंडीबा घुटूकडे, भारत क्षीरसागर, जैनू मुलाणी, येळवी ग्रामपंचायत उपसरपंच सुनील अंकलगी व दीपक अंकलगी, प्रवीण तोडकर आदी मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन ढगे कुटुंबियांना धीर देत, स्वखर्चातून प्रापंचिक साहित्य व जीवनावश्यक वस्तू दिल्या.