तासगाव : तासगाव शहरातील स्वछता ठेका नगरपालिकेने दिलेल्या कंपनीने या कामासाठी तासगावबाहेरील कामगार आणले आहेत. याच्या निषेधार्थ काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील व सफाई कामगारांनी बसस्थानक चौकात कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन केले. शहरातील भुमिपुत्रांना न्याय देण्याची त्यांची मागणी होती. मात्र, ठेकेदार व प्रशासनाने स्थानिक कामगार घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले.
यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले, शहरात कोरोना महामारीमुळे प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली असून, स्वच्छता करणेसाठी, झाडू मारणेसाठी अनेक बेरोजगार तरुण व महिला हे काम करण्यास तयार आहेत. असे असताना ठेकेदाराने बाहेरचे कामगार आणले. ते बंद करून शहरातील कामगारांना काम देण्यासाठी काँग्रेसने यापूर्वी निवेदन दिले होते. तरीसुद्धा ठेकेदार शहरातील कामगारांना कामावर घेत नसल्याने काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी व तरुणांनी मंगळवारी संपूर्ण ठेका बंद पाडला. त्यांची वाहने बसस्थानक चौकात अडवून त्याच्यासमोर ठिय्या मांडला. यानंतर घटनास्थळी ठेकेदार, अधिकाऱ्यांनी धाव घेत काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्याबरोबर चर्चा करून शहरातील भुमिपुत्रांना न्याय देऊन कामगारांना कामावर हजर करून घेण्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. या आंदोलनाचे नियोजन काँग्रेसचे विकास जाधव, शिवाजी गुळवे, कल्पना जावळे यांनी केले. या आंदोलनाला स्वाती लोहार, ज्योती जावळे, छकुली साणखे, रंजना जावळे, बाळाबाई जावळे, नीता जावळे, मालन जावळे, रेणुका कटगिरे, ज्ञानबा काटगिरे, रत्नबाई घुले, कल्पना जाधव, वजाबाई जाधव, राधिका जावळे, सुमन कुडकर, ललित वाघमारे, द्रुपा बनसोडे उपस्थित होते.