बाबासाहेब परीट - बिळाशी -घरची परिस्थिती बेताची. दारिद्र्य पाचविला पूजलेलं. बापजाद्यांची गुंठ्यात जमीन. ती देखील वादात अडकलेली. परिस्थितीनं शिक्षण अर्ध्यात सुटलं. नोकरीपेक्षा स्वत:च्या पायावर उभं राहण्याची जिद्द बागळणाऱ्या तरुणाने दोन—तीन जनावरांची दहा—बारा जनावरं केली. घरचे भात मळण्याची गडबड चाललेली. सारी घाई सुरु होती. तो यंत्रामध्ये भात घालत होता. अचानक त्याचा पाय यंत्रामध्ये गेला. कुणाला कळायच्या आत पाय गुडघ्यातून तुटून वीस फुटावर पडला. तो यंत्रावरुन खाली कोसळला. पिंजर, भात रक्ताने माखले. धन-धान्याने घर भरणार म्हणून आसुसलेल्या एका शेतकऱ्याच्या पोराचे खळे नियतीने उजाड केले. शिराळा येथील गणेश दिलीप नलवडे या पंचवीशीतल्या युवकाची ही दर्दभरी कहाणी.अत्यंत गरीब कुटुंबातला गणेशचे शिक्षण पैशापायी दहावीतून थांबलं. घरी दोन—तीन जनावरं. पण त्यानं स्वत:च्या हिमतीवर १0—१२ जनावरं केली. कोणतंही व्यसन नसलेल्या गणेशने कळशीनं दूध घातलं. मजुराही केली. इतरांना मदत करणारा, पैरा करून काम हलविणारा गणेश लहान असूनही घरचा आधार बनला होता. घरी चार भावंडं. एका बहिणीचं लग्न झालेलं. स्वत:ला शिकता आलं नाही तरी धाकट्या बहिणीला शिकवणारा हा पोर घरचा भात मळण्यासाठी खळ्यावर गेला. मित्रांना हाताशी घेऊन भात गाळायला सुरुवात केली. त्यातच पावसाची चिन्हं दिसू लागली. त्यामुळे सारी गडबड उडाली होती. थोडा भात गाळायचं शिल्लक होतं. ते यंत्रामध्ये गडबडीत घालताना गणेशचा पाय यंत्रामध्ये गेला. गुडघ्यातून पाय तुटून २0 फूट लांब पडला. रक्ताच्या चिळकांड्या यंत्रामधून बाहेर पडल्या. काही कळायच्या आतच गणेश खाली कोसळला. त्याला त्वरित कोल्हापूरला उपचारासाठी नेलं. पाय पोत्यात घालून नेला. सध्या तो कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेतोय. सुपासारखा पैसा ओतावा लागतोय. त्याचे वडील थकलेत. आई तर या प्रसंगाने खचली आहे. सारं घर कोसळलंय. त्यांना गरज आहे समाजाच्या आधाराची. पांगळ्या झालेल्या घराला हातभार लावण्याची.सध्या गणेशला कृत्रिम पाय बसविण्याची गरज आहे. जयपूर फूटसाठीचे पैसे त्याच्याकडे नाहीत. समाजातील दानशूरांनी मदत केली तरच तो स्वत:च्या पायावर उभा राहील. समाजाच्या आधाराची गरजगणेशला कोणतंही व्यसन नाही. घर एके घर, काम एके काम, रान एके रान. कुणी त्याला गॅसची टाकी ठेव म्हटलं की ठेवणारा, लहान मुलाने काम सांगावं, ते ऐकणारा, असा हरहुन्नरी गणेश. स्वत:चं रानातील काम करता करता रोजगारावर जाणारा. स्वकर्तृत्वावर परिस्थिती बदलवणाऱ्या या युवकाला समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे.
गणेशच्या जिद्दीला निर्दयी नियतीची नजर!
By admin | Updated: November 14, 2014 23:21 IST