सांगलीत गणेशमूर्ती आणणाऱ्यांची अशी तोबा गर्दी होती. गणेशभक्तांना मास्कचे किंवा सोशल डिस्टन्सिंगचे भान नव्हते.
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विघ्नहर्त्याचे स्वागत करताना गणेशभक्तांना कोरोनाच्या विघ्नाचाच विसर पडला. कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवत सांगलीकर रस्त्यावर आले. प्रमुख बाजारपेठा असलेल्या रस्त्यांवर दिवसभर तुफान गर्दी होती. कोरोनाच्या नियमांचे पालन कोठेच होत नव्हते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने उत्सवात गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासन सातत्याने करत आहे. नियमांचे पालन करावे म्हणून कानीकपाळी ओरडून सांगत आहे. नागरिक मात्र कोरोना जणू संपल्याच्याच अविर्भावात आहेत. गणेशोत्सवात गर्दीचे नियंत्रण मुश्किल असले, तरी कोरोना नियमांचे पालन मात्र शक्य होते, त्याचाही विसर सांगलीकरांना पडल्याचे दिसून आले. हरभट रस्ता, कापडपेठ, मारुती रस्ता येथे दिवसभर गर्दी होती. पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. रस्त्यातच स्टॉल लागल्याने लोक परस्परांना धक्काबुक्की करत जात होते. सोशल डिस्टन्सिंग काय असते? असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती होती. सर्रास नागरिकांनी मास्क घातला नव्हता किंवा तो नाकावर नव्हता. विक्रेत्यांनी तर मास्कला कधीच पायदळी तुडवल्याचे दिसून आले. या गर्दीतच अनेक वृद्ध आणि मुलेदेखील कोरोनाची फिकीर न करता वावरत होती.
एरवी चौका-चौकात थांबून मास्क नसल्याबद्दल दंडाची पावती फाडणाऱ्या पोलिसांनी या गर्दीकडे मात्र दुर्लक्षच केले. मास्क वापरण्यासाठी कोणालाही हटकले नाही. अनेक दुकानांमध्ये `मास्कशिवाय प्रवेश नाही` असे फलक होते. ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करत विनामास्क दुकानात जात होते. गणेशमूर्तींच्या दुकानांतही तोबा गर्दी होती. मूर्ती घेऊन जाताना जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही कोरोनाचा विसर पडला होता. जिल्हा बॅंकेसमोरील परिस्थिती फारच गंभीर होती. गर्दीमुळे सर्वत्र धक्काबुक्की सुरू होती. त्याच गर्दीत खाद्यपदार्थांचे स्टॉलही लागले होते. उघड्यावरील वडे-भजी, भेळ यावर कार्यकर्त्यांची पोटपूजा सुरू होती. स्टॉलमध्येही नागरिकांची बिनधास्त गर्दी होती.
चौकट
...कोरोनाला पुन्हा घेऊन या
बाप्पाने कोरोनाचे विघ्न दूर करावे, यासाठी घरोघरी भाविक प्रार्थना करत होते, रस्त्यावर मात्र नेमके याच्या उलट वर्तन होते. कोरोना संपलाच, या भावनेने सर्वजण वावरत होते. एकीकडे मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष सुरू असताना कोरोनाही जणू पुन्हा यावा, असे भाविकांचे व्यवहार सुरू होते.