मिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला गुरूवारी, अनंतचतुर्दशीदिवशी सकाळी सुरुवात होत आहे. सुमारे दोनशे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळपासून मिरवणुकांना सुरुवात होत आहे. मोठ्या गणेशमूर्तींची स्थापना केलेल्या १५० मंडळांच्या गणेशमूर्तींचे कृष्णा घाटावर नदीत व ४५ मंडळांच्या गणेशमूर्तींचे गणेश तलावात विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर दुतर्फा विविध पक्ष व संघटनांनी उभारलेल्या स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत आहेत. डॉल्बीवर प्रतिबंध असल्याने बँड, बेंजो, झांज, ढोल, लेझीम व पारंपरिक वाद्यांचा वापर रात्री १२ वाजेपर्यंतच होणार आहे. कृष्णा घाट व गणेश तलाव येथे महापालिकेतर्फे यांत्रिक बोट, तराफा, क्रेन व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या मूर्तींचे कृष्णाघाटावर क्रेनद्वारे नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्यासह बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा मिरजेत पाचारण करण्यात आला आहे. मिरवणुकीसाठी सार्वजनिक मंडळांनी सजीव देखावे व आकर्षक सजावट केली आहे. मिरवणूक मार्गावर विश्वशांती मंडळ, मनसे, मराठा महासंघ, शिवसेना, हिंदू एकता, एकता मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी मंडळासह विविध मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. महापालिका, जनसुराज्य शक्ती, रिपाइं, शिवसेनेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर उंच मनोऱ्यांतून व इमारतींवरुन शस्त्रधारी पोलिस मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. मिरवणूक रेंगाळत ठेवून उशिरा विसर्जन करणाऱ्या मंडळांवर व मद्यपान करुन शांतताभंग करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विसर्जनासाठी वेळेचे बंधन सर्वांनी पाळावे. वेळ न पाळणाऱ्या गणेश मंडळांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. (वार्ताहर)
मिरजेत आज रंगणार गणेश विसर्जन सोहळा
By admin | Updated: September 15, 2016 00:00 IST