आटपाडी : पालकमंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच वासुंबे (ता. खानापूर) येथे कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर पुन्हा राष्ट्रवादीत परत यावेत, यासाठी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले. मतदारसंघात हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगितलेला अनुभव आठवतात; त्यांचे विधान किती खरे होते याची प्रकर्षाने जाणीव होते.
खानापूर- आटपाडी मतदारसंघ हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता; पण सध्या येथे राष्ट्रवादीची अवस्था बिकट आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील हे राष्ट्रवादीत असले तरीही मंत्री जयंत पाटील यांनी आमदार बाबर यांना पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन करून त्यांचीही गोची केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी जिल्ह्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही भाजपचा झेंडा सध्या खांद्यावर घेतला आहे.
आटपाडीत १९९१ पासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आयोजित होणाऱ्या पाणी परिषदेस अध्यक्ष म्हणून सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख हे उपस्थित राहत होते. यामुळे त्यांना या भागातील राजकारणाची जाण होती.
काही वर्षांपूर्वी आटपाडीतील काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी गणपतराव देशमुख यांची सांगोला येथे भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांबाबत देशमुख यांच्याशी चर्चा केली होती. यावर देशमुख म्हणाले होते की, यामागे राजकीय गणित असून खानापूर-आटपाडीतील आमदार बाबर, राजेंद्रअण्णा देशमुख किंवा सदाशिवराव पाटील या तिघांपैकी जे कोणी आमदार होतील, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देतील. या दोन्ही पक्षांना जनतेची नव्हे, तर आमदारांची गरज असते. यामुळे स्थानिक नेते जोपर्यंत दुसरा पर्याय शोधणार नाहीत; तोपर्यंत तुमच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना तुमच्या भागाकडे लक्ष देण्याची गरज नाही.
हा धागा पकडला तर आमदार बाबर शिवसेनेत गेले आणि जयंत पाटील यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावल्याचे विधान गणपतराव देशमुख यांच्या अनुभवाचे बोल सत्यात आल्याची प्रचिती येत आहे.
चौकट
एका दगडात दोन पक्षी!
आमदार अनिल बाबर शिवसेनेचे आमदार असले तरी मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनकामात ते फारसे नसतात. सदाशिवराव पाटील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये असले तरी त्यांनीही पक्ष मजबूत करण्यासाठी किती योगदान दिले; हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी सदाशिवराव पाटील यांना सूचक इशारा दिला आणि आमदार बाबर यांचे शिवसेनेत आणि भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील संबंधांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.