लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : बुरुंगवाडी (ता. पलूस) गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी केले.
बुरुंगवाडी (ता. पलूस) येथे जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून अकरा लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शरद लाड यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांच्या उपस्थितीत जनसुविधा योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक योजनेंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लाॅक बसविणे, आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
लाड म्हणाले, मतदार संघातील गावांत आवश्यक सोयी-सुविधांसाठी आम्ही कुठेच कमी पडलो नाही. नितीन नवले यांच्या माध्यमातून या भागात नेहमीच कामे उभी राहिली आहेत. यापुढेही ती हाेतच राहतील.
यावेळी सरपंच अस्मिता बनसोडे, उपसरपंच राजेश चव्हाण, सुनील जाधव, मोहन पाटील, नीलेश जाधव, विनोद पाणबुडे, स्वाती जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.