लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यासाठी नव्याने मंजूर असलेले उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयास निधी देऊन तत्काळ अपूर्ण काम पूर्ण करावे. तसेच या कार्यालयालगतची महापालिकेची जागा टेस्ट ट्रॅकसाठी कायमस्वरूपी देण्यात यावी, या मागणीसाठी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली.
सध्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीत खासगी जागेत भाडेतत्त्वावर आरटीओ कार्यालय सुरू आहे. तसेच मौजे सावळी (ता. मिरज) येथील कार्यालय व परिसरात वाहक-चालक चाचणी व परिवहन वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज चालू आहे. या दोन्ही कार्यालयांमध्ये खूप मोठे अंतर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जाणे नागरिकांना त्रासाचे व न परवडणारे आहे. याचा विचार करून शासनाने जुना बुधगाव रोडवर नवीन आरटीओ कार्यालय मंजूर केले आहे. त्याचे बांधकाम निधीअभावी अपूर्ण आहे. या जागेवर असलेल्या इमारतीची दुरुस्ती, वायरिंग व इतर अनेक कामांसाठी निधी मंजूर आहे. खर्चाच्या अंदाजपत्रकासह प्रशासकीय, वित्तीय मान्यता मिळालेली आहे. परंतु शासनाकडून अद्याप निधी मिळालेला नाही.
या मंजूर कार्यालयाशी संलग्न एक हेक्टर पंधरा आर. इतकी जागा टेस्ट ट्रॅक व ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकसाठी शासनाकडे मागणी केली आहे. त्याबाबतही लवकरच निर्णय घ्यावा, अशी विनंती पाटील यांनी परिवहनमंत्र्यांना केली. परब यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना परिवहन सचिवांना दिल्या.
फोटो ओळी : जिल्ह्यातील नवीन आरटीओ कार्यालयाच्या इमारतीस तत्काळ निधी द्या, या मागणीचे निवेदन विशाल पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले.