कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबर व लघु उद्योग भारती यांच्या वतीने औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिरम संस्था पुणे या लस उत्पादक कंपनीने त्यांच्या सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून लसीकरणाची तरतूद केली आहे. त्यानुसार कृष्णा व्हॅली चेंबर आणि लघु उद्योग भारती (सांगली) यांच्या वतीने औद्योगिक वसाहतीतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. ४ सप्टेंबरपासून मोहिमेची सुरुवात होणार आहे. यासाठीचे ठिकाण कृष्णा व्हॅली चेंबर कॉन्फरन्स हॉल निश्चित केले आहे.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्योजकांनी शुक्रवारपर्यंत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची यादी कृष्णा व्हॅली चेंबरकडे सादर करावी. तसेच लसीकरणासाठी येणाऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन अध्यक्ष मालू यांनी केले. यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, लघु उद्योग भरतीचे अध्यक्ष विनोद पाटील, मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.