सांगली : ऐनवेळच्या ठरावावरून सोमवारी महापालिकेच्या महासभेत रणकंदन माजले. महापौरांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी काँग्रेस व विरोधक एकवटल्याने सभेत प्रचंड गदारोळ झाला. या गोंधळातच महापौरांनी सभा गुंडाळली. सभेनंतर सत्ताधारी व विरोधकांनी आक्रमक होत नगरसचिव चंद्रकांत आडके यांना अडविण्याचा प्रयत्न केला. माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, संतोष पाटील यांसह काही सदस्यांनी आडके यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. त्यांना सभागृहातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. गटनेते किशोर जामदार यांनी मध्यस्थी करीत आडके यांना सभागृहाबाहेर काढले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच हाणामारीचा प्रसंग घडला. महापौर विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा चांगलीच वादळी ठरली. सभेत ऐनवेळच्या ठरावावरून सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. त्याला सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनी साथ दिली. गत सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. इतिवृत्त पूर्ण होताच महापौरांनी विषयपत्रावरील विषयांचे वाचन सुरू केले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी, अजून तीन विषय वाचलेले नाही, म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर हे महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांनी ठराव क्रमांक १७५ ते १७८ वाचण्याची मागणी केली. पण महापौरांनी त्याला नकार दिला. मजलेकर यांच्या साथीला विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, संतोष पाटील यांच्यासह इतर सदस्य धावले. सभागृहात प्रचंड गदारोळ उडताच महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर करीत आसन सोडले. त्यांच्यासोबत उपमहापौर प्रशांत पाटील, उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ हेही बाहेर पडले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी, महापौरांनी पळ काढल्याचा आरोप करीत घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंनी समांतर सभा चालविण्याचा निर्णय घेतला. याचवेळी नगरसचिव आडके पीठासनावरील साहित्य घेऊन सभागृहाबाहेर चालले होते. त्यांना मजलेकर, सूर्यवंशी, माने, संतोष पाटील आदींनी अडविले. आडके यांनी जबरदस्तीने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर्वच सदस्य त्यांच्या अंगावर धावून गेले. मजलेकर यांनी त्यांच्या शर्टाला हात घातला. यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली. गटनेते जामदार यांनी सदस्यांना अडवून नगरसचिवांना बाजूला केले. ते दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडताना पुन्हा संतोष पाटील व इतर सदस्य त्यांच्या दिशेने धावले. त्यांनी सभागृहाचे दरवाजे बंद करून घेतले. यावेळी पुन्हा आडके यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही सदस्यांनी मध्यस्थी करून आडके यांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी सभागृह न सोडता समांतर सभा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूचे ६७ नगरसेवक उपस्थित होते. पण कायद्याने बंधन आल्याने सभा न घेताच महापौरांचा निषेध करण्यात आला. (प्रतिनिधी) मजलेकर पंप ठरला कळीचा मुद्दा तरुण भारत क्रीडांगणासमोर मजलेकर आणि कंपनीला महापालिकेने पेट्रोल पंपासाठी जागा दिली आहे. सध्या हा पेट्रोल पंप बंद आहे. त्यांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. गत सभेत स्वाभिमानी आघाडीचे सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी ही जागा पालिकेने ताब्यात घेण्याची सूचना मांडली होती. तसा ठराव ऐनवेळी करण्यात आला असून, बीओटीवर जागा लाटण्याचा उद्योग सुरू असल्याचा माजी उपमहापौर मजलेकर यांचा आरोप होता. त्यांनी हा ठराव वाचण्याची मागणी लावून धरली होती. त्याला महापौरांनी विरोध करताच गोंधळाला सुरुवात झाली. यातून धक्काबुक्की, हाणामारीचा प्रसंग घडला. मजलेकर पंप ठरला कळीचा मुद्दा तरुण भारत क्रीडांगणासमोर मजलेकर आणि कंपनीला महापालिकेने पेट्रोल पंपासाठी जागा दिली आहे. सध्या हा पेट्रोल पंप बंद आहे. त्यांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. गत सभेत स्वाभिमानी आघाडीचे सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी ही जागा पालिकेने ताब्यात घेण्याची सूचना मांडली होती. तसा ठराव ऐनवेळी करण्यात आला असून, बीओटीवर जागा लाटण्याचा उद्योग सुरू असल्याचा माजी उपमहापौर मजलेकर यांचा आरोप होता. त्यांनी हा ठराव वाचण्याची मागणी लावून धरली होती. त्याला महापौरांनी विरोध करताच गोंधळाला सुरुवात झाली. यातून धक्काबुक्की, हाणामारीचा प्रसंग घडला.
महापालिका सभेत फ्री स्टाईल हाणामारी
By admin | Updated: April 21, 2015 00:32 IST