लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील प्रशासकीय इमारती शेजारी असणाऱ्या पंगत डायनिंगमधील महाराष्ट्र शासनाच्या शिवभाेजन केंद्रात पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मोफत चिकन आणि अख्खा मसुराची मेजवानी देण्यात आली. साडेतीनशे जणांनी या शाकाहारी व मांसाहारी थाळीवर ताव मारला.
या शिवभाेजन केंद्राचा मंगळवारी पहिला वर्धापनदिन अभयसिंह आनंदराव पवार या दोनवर्षीय चिमुकल्याच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. केंद्र संचालिका अलका शिंदे आणि रणजित शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच रुपयांत शिवभाेजन थाळी गरजू नागरिकांची भूक भागवत आहे.
सध्या कोरोनामुळे गरिबांच्या घरी चूल पेटणे मुश्कील झाले आहे. मांसाहाराचे वाढते दर खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे गरजूंना ही मेजवानी देण्यात आली.
गेल्या वर्षभरात या शिवभाेजन केंद्रावर तब्बल ५२ हजारांहून अधिक थाळीचे वितरण झाले आहे. मंगळवारी वर्धापनदिन असल्याने केंद्र संचालिका अलका शिंदे यांनी आपल्या सहकारी सुलाबाई साळुंखे,अनिता शिंदे व घरातील महिलांच्या मदतीने मांसाहाराचा बेत आखला. रोजच्या दीडशे गरजू नागरिकांना मसूर व चिकनचा आस्वाद घेता आला.
शिवभाेजन केंद्रात गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद दररोज न्याहाळता येत असल्याची प्रतिक्रिया संचालिका अलका शिंदे यांनी दिली. उमेश पवार, सागर मलगुंडे,सीमा कदम,ऋषिकेश शिंदे, संजय गायकवाड, रामचंद्र चव्हाण,सोमनाथ माने, कीर्तीकुमार पाटील, हणमंत कदम उपस्थित होते.