प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीची मशागत करणे महाग झाले आहे. त्यामुळे काही गरीब व अल्पभूधारक शेतकरी पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचे धाडस करीत नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या पडीक शेतजमिनीत स्वत:च्या ट्रॅक्टरने मोफत मशागत करून देण्याचा निर्धार आसद (ता. कडेगाव) येथील तरुणाने केला आहे.येथील निशांत दिलीप जाधव हा तरुण वडिलांसोबत प्रयोगशील शेती करीत आहे. स्वत:च्या शेतामध्ये सातत्याने विक्रमी उसाचे उत्पादन घेत आहेत. मागील आठवड्यात निशांतने नवीन ट्रॅक्टर घेतला. ग्रामदेवता चौंडेश्वरीच्या मंदिरासमोर ट्रॅक्टरचे पूजन केले. यावेळी आ. मोहनराव कदम यांच्या व डॉ. जितेश कदम यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत निशांतने नि:स्वार्थी जनसेवेचा संकल्प व्यक्त केला. त्याने चुलते आसदचे माजी सरपंच व सोनहिरा कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव यांच्याकडून हा वसा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर आ. कदम यांनी निशांतच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत हे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याची प्रेरणा दिली. आसदमध्ये ताकारी योजनेचे पाणी आल्याने ८० टक्के शेती बागायती झाली. बहुतांशी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले; परंतु शेतीसाठी सोयी-सुविधांची व संधीची समानता असताना, काही शेतकºयांनी लागवडीयोग्य जमिनीही पडीक ठेवल्या आहेत. याची कारणे शोधण्यासाठी निशांतने संबंधित शेतकºयांशी संवाद साधला. यातून असे लक्षात आले की, लागोपाठ तोट्यात राहणारी शेती ही अधोगतीचे कारण ठरत आहे. शेतीमालाच्या पडलेल्या भावाचे दुष्परिणाम शेतीवर अवलंबून असणाºया कुटुंबांना भोगावे लागतात. यामुळे उदासीन झालेले शेतकरी लागवडीयोग्य जमिनीही पडीक ठेवून निमुटपणे जीवन जगतात.उपक्रमाचे परिसरात कौतुकआसदमधील केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकºयांना आम्ही तुमच्या मागे आहोत, असा संदेश देत कोणतेही शुल्क न घेता पदरमोड करत मशागतीसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून देणाºया निशांत जाधवने केलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आसदला अल्पभूधारकांच्या शेतात मोफत मशागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:51 IST