इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालकास जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मुकादमाने ऊसतोडणी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. फसवणुकीचा हा प्रकार सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१८ मध्ये घडला आहे.
याबाबत हौसेराव जगन्नाथ वाटेगावकर (वय ४४, रा. बोरगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रावण भावडू जाधव (रा. जामनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाटेगावकर यांचा ट्रॅक्टर असून ते ऊसतोडणी वाहतुकीचा ठेका घेत असतात. या कामासाठी मजूर पुरविण्याचा करार सप्टेंबर २०१८ मध्ये श्रावण जाधव याने वाटेगावकर यांच्याशी केला होता. त्यापोटी वाटेगावकर यांनी उत्तम विलास पाटील व सुरेश रघुनाथ पवार (दोघे रा. नागठाणे) या मध्यस्थासमक्ष जाधव याला चार लाख रुपये रोख दिले होते. मात्र, जाधव याने मजूर न पुरविता ही रक्कम घेऊन वाटेगावकर यांची फसवणूक केली.